पाय मातीचे .... डोकं .....

सामवेदी ब्राह्मण संघ प्रतिनिधी मंडळ , अध्यक्ष , पदाधिकारी निवडणूक झाली. आता काही दिवस कवित्व राहील. 

नवीन प्रतिनिधी मंडळाला, विधायक कामासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!


या निवड प्रक्रियेत  काही अपसमज , गैरसमज , पसरविले गेले. त्यातील महत्वाचा 

संजीवनी परिवाराने निवडणूक प्रतिष्ठेची केली.  

संजीवनी परिवाराने  निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला नव्हता. दुस-या संस्थेच्या निवडणुकीत संजीवनी म्हणून भाग घेणे  गैर आहे. म्हणून संजीवनी परिवार अलिप्त होता. व्यक्तिगत पातळीवर सदस्यांना भाग घेण्याची मुभा होती. 

संजीवनी परिवाराचे  काही सदस्य  निवडणूक प्रक्रियेत सक्रिय होते. जे सदस्य सक्रिय होते ते साब्रा संघ प्रतिनिधी मंडळाचे सदस्य होते. 

ज्यांना भेदाभेद दाखवायची होती त्यांनी इंग्रजांची नीती वापरली असो. 


 निवडणूक प्रक्रिया, निरीक्षणं 

आपली संस्था सामाजिक कमी आणि राजकीय जास्त झाली आहे . निवडणुकीत  राजकीय डावपेच, दिलेला शब्द पाळण्यासाठी नसतोच ही नेतृत्वाची मानसिकता, असे अनेक रंग दिसले, रंग इतके काळे गडद होते कि न बोललेलं बरं. 

 एकवचनी प्रथमपुरूषी म्हणजे माझ्यासंबंधी 

 मी कमलाकर पाटील राजोडी शाखेतील एक सामवेदी बांधव. सामवेदी ब्राह्मण संघ प्रतिनिधी मंडळ २०२२-२७ निवड प्रकियेत भाग घेतला होता. अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं सांगणे ही चूक असेल तर ती चूक  नक्कीच केली होती. परंतु  पुढे काय कामं करायची आहेत,  या विषयी स्पष्टता असेल तर अशी पारदर्शक  भूमिका घेणे रास्त वाटलं. साब्रा प्रतिनिधी मंडळावर समाजापुढील आव्हाना विषयी मेसेज लिहले होते, प्राधान्य क्रम ही मांडला होता.  काही मंडळींचं म्हणणं पडलं की अध्यक्षपदा साठी इच्छुक असं सांगणे हेच  चुकलं. 

संस्थेवर आपलाच माणूस असावा, मागच्या टर्मला मदत केली आहे आता परतफेड  केलीच पाहिजे , येनकेन प्रकारे आपणच व्हायला पाहिजे अशी मानसिकता असलेली दुष्टशक्ती एकत्र आली. त्यांनी ठरवलं की स्पर्धचं आव्हान देऊ शकतील अश्याना शाखापातळीवरच जेरबंद करावं त्यात ते यशस्वी झाले असावे असं म्हणता येईल. परंतु गवताला भाले फुटतात हे त्यांना माहित नसावं.   

नवीन लोकांचा  संघशक्ती वर दृढ विश्वास आहे. जो  राहील तो पुढाकार घेईल कारण संघभावना श्रेष्ठ , समाजहिताला प्राधान्य , व्यक्तीगत मानसन्मानाला अंतिम स्थान. यातूनच मला  राजोडीत  हरवल्यानंतर टीम सदस्यांनी बॅटन हातात घेतली आणि प्रक्रिया पुढे सुरु ठेवली. 

 महत्वाकांक्षा आंधळी असते  मूल्यांचा बळी दिला जाईल. येनकेन रित्या  इप्सित ध्येय साध्य केलं जाईल . "साध्या"  इतकेच किंबहुना थोडे जास्त महत्व  "साधनेला" असते.  हे विसरले जाईल   साधनसुचिता  सोडलेलीच आहे.  

 

इतिहासातून आपण काही शिकत नाही हे पूलं नी फार वर्षांपूर्वी सांगितलं आहे. हे माझ्या पुरता तरी खरं ठरलंय किंवा मी ठरवून दाखवलं आहे.  दहा वर्षांपूर्वीच्या राजोडी शाखेतील प्रतिनिधी मंडळ निवडणुकीतुन मला न येऊ देण्याचा घाट घातला होता. हीच मंडळी तेव्हा क्रियाशील होती. आता हि तीच मंडळी आहे. देव त्यांना सारासार विवेक प्रदान करो. ईर्षा कधीही वाईटच परंतु ती उतारवयात.  ८०-८२ व्या  वर्षी केली तर अधिक वाईट. ती कश्यासाठी  हे ही बघता यायला हवं.  लोभ असाच , मलाच सर्व हवं, एखाद वेळी मिळेलही परंतु  सर्व मूल्यं गमावलेली असतील, संस्थेचं मुल्याकंन करून ,संस्थेचं हित लक्षात घेऊन योग्य भूमिका घेणे ही नेतृत्वाची खरी कसोटी आहे. लोभ आंधळा झाला, नेतृत्वगुण अवेळी सोडून गेला. 


बंधुभगिनींनो ,   समाज नेतृत्व , आपल्या माणसासाठी, आपल्या वर्चस्वासाठी कार्यरत होत असेल तेव्हा  सर्व प्रतिनिधींनी अधिक सजग व्हायला पाहिजे. जैमुनी संचालक मंडळांची ६ आणि ३ अशी वाटणी केली. आपलं ऐकणा-या  कठपुतळीला अध्यक्ष केलं. परिणाम आपण सर्व जाणताच. सदैवं बरोबर असणारा, त्यांच्याच नाकाखाली जैमुनीला चुना लावतो हे दिसतच नाही इतकी दृष्टी प्रेमाने अधू होते. खरंतर घोटाळ्या अगोदरच चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप, आतबट्याचे व्यवहार 'अ' वर्गापर्यंत सुरु होते, मॅनेज करता येत होते.  ते 'ब' वर्गाला द्यायला सुरवात केली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. जैमुनींच्या घसरणीची सुरवात आदींच्या मंडळींनी केली होती हे आपल्या लक्षात आलं  असेलच. 


मुबईच्याजवळ , एक सुसंकृत समाज म्हणून तालुक्यात आपली ओळख आहे. आपल्यातील मंडळी जिल्हा , तालुका पातळीवर नेतृत्व करत आहेत. त्यांना सुयश चिंतितो, परंतु सामाजिक पातळीवरील संस्थेत यांचं योगदान काय याचं मूल्यमापन करणार आहोत कि नाही. मुख्य संस्था सामवेदी ब्राह्मण  संघ, काय स्थिती आहे. वर्षोनुवर्षे स्थावर मालमत्तेचे प्रश्न, नवीन सक्षम  नेतृत्वाची, कार्यकर्त्याची फळी तयार करण्यात अपयश. सामाजिक संस्था चे राजकीयीकरण .प्रतिनिधी मंडळ निवडीत लुडबुड करून स्मूथ बदलामध्ये खोडा घालून आपलं महत्व वाढविण्याची वृत्ती.  . 

जैमुनी  विषयी  तुम्ही जाणताच, एक शिक्षण संस्था होती, निराधार निधी होता. या सर्व संस्था चे मूल्यपमान आपण करणार आहोत की नाही.  सर्व मंडळी विषयी मला आदर आहे. 


सुरेश भटांच्या गझलेत काही बदल करून  

 

संपला आता जमाना गप्प  राहण्याचा !

समाजहितासाठी  घे योग्य भुमिका !!

अरेरावी आणि माझेच खरे म्हणणा-या !

दाखवी रस्ता वानप्रस्थाश्रमा चा!

घेतले खुप श्रम तुम्ही घ्या विसावा. 

शेवटचे दिस गोड करा तुमचे.


निराशाजनक वातावरण आहे पण आपण निराश होऊन नाही चालणार. आजच एका मित्राने चार ओळी पाठवल्या !   

मी सोडणार नाही रणांगण

कारण त्याच्या मातीच लिंपण केलय

पुर्वसुरिंच्या घामन,रक्तान

मी लढेन सारथी होऊन

लढणारा पार्थ असो वा शिखंडी

मी सांगेन त्या भिष्माला,द्रोणाचार्याला

ज्या रणदुंदुभी तुम्ही वाजवताय

त्यातुन येताहेत  आवाज सर्वनाशाचे

पिढ्यांच्या बरबादीचे

थांबवा आता हा खेळ

माझ्याकडे जरी नसतील बाण

काटेरी बोलांचे,शिव्याशापांचे

पण कवच आहे कणखर पोलादी

वज्रादपि मनाचे,निरंतर लढण्याचे

.  

आपण सर्व समाज बंधू भगिनी एक निश्चय करू या !! समाजापुढे अनेक आव्हानं आहेत. आपण एकजुटीने , एकदिलाने  आत्मभान असलेला  , आत्मनिर्भर, समाज निर्माण करण्याचा वसा घेऊ या !!

Comments